कार्यालयात वाढली अस्वच्छता
परभणी : शहरातील शासकीय कार्यालयांमध्येच अस्वच्छता निर्माण झाली आहे. कार्यालयाच्या आतील भाग स्वच्छ ठेवला जात असला तरी कार्यालय परिसर मात्र अस्वच्छ असतो. या भागात नियमित स्वच्छता होत नसल्याने धूळ वाढली आहे. त्याचा त्रास कर्मचाऱ्यांबरोबरच नागरिकांना सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच भूजलपातळीही वाढलेली आहे. असे असताना ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. कुठे पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित असल्याने तर कुठे योजना नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याकडे जि.प. पाणीपुरवठा विभागाने लक्ष द्यावे, ग्रामस्थांची मागणी आहे.
वीजपुरवठा खंडित करण्याची माेहीम
परभणी : मार्च महिना जवळ आला असून, महावितरण कंपनीने आता थेट वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. ग्रामीण भागामध्ये थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याने संपूर्ण गावाचा वीजपुरवठा बंद ठेवला जात असल्याने गावे अंधारात राहत आहेत.
गहू, हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ
परभणी : यावर्षीच्या रब्बी हंगामात गहू आणि हरभऱ्याचा पेरा घेण्यात आला आहे. अनेक वर्षानंतर जिल्ह्याला कालव्याच्या माध्यमातून रब्बी हंगामात पाण्याचे तीन आवर्तन मिळाले. वेळेवर उपलब्ध झालेले पाणी आणि सिंचनासाठीच्या स्थानिक सुविधा निर्माण केल्याने यंदा गहू आणि हरभऱ्याच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या दोन्ही पिके वाढीच्या अवस्थेत असून, दोन्ही पिकांचे उत्पादन साधारणत: महिनाभरात हाती लागणार आहे.
अंतर्गत रस्त्यांवर वाढले खड्डे
परभणी : शहरातील अनेक वसाहतींमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्तेही उखडले असून, वाहने चालविताना नागरिकांना कसरत करावी लागते. मागील अनेक महिन्यांपासून या समस्या सतावत आहेत. रस्त्यांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ही कामे ठप्प आहेत.