जिल्ह्यात मुद्रांकांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील सर्व मुद्रांक विक्रेत्यांच्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण केले जाते. त्यासाठी मुद्रांक विक्रेत्यांना चारित्र्य पडताळणी अहवाल गरजेचा आहे. मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी १९ मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल केली आहे. परंतु अद्याप चारित्र्य पडताळणी अहवाल मुद्रांक जिल्हाधिकारी यांना प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे. या अहवालाला विलंब झाला तर विक्रेत्यांना नवीन मुद्रांक खरेदी करता येणार नाहीत. परिणामी जिल्ह्यात मुद्रांकांची टंचाई निर्माण होऊ शकते. ही बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने चारित्र्य पडताळणी अहवाल त्वरित मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवावेत, अशी मागणी शासकीय परवानाधारक मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक संघटनेचे हरी सोनटक्के, सुरेंद्र येलदरकर, झेड. एन. खतीब, संजय सरदेशपांडे, शिवाजी भोरगे आदींनी केली आहे.