परभणी : कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढविली आहे. मात्र असे असतानाही नागरिकांचा लसीकरण करुन घेण्यास अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे.
जिल्ह्यात लसीकरण करून घेण्यासाठी १२ लाख लोकसंख्या अपेक्षित आहे. यापैकी ३० जूनपर्यंत ३ लाख ८८ हजार ६७०जणांनी लसीकरण पूर्ण केले आहे. मागील काही दिवसांमध्ये राज्यात डेल्टाप्लस या व्हेरिएंटने नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येकाने काळजी घेऊन लसीकरण करणे गरजेचे आहे. सध्या १८ ते ४४ व ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. तरीही अनेकांनी लसीकरण करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीतून दिसून येते.
१८ ते ४४ वयोगटांत केवळ १३ टक्के
जिल्ह्यात १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांची संख्या जवळपास सहा लाख ४८ हजार आहे. यापैकी सध्या ८० हजार ६३९ जणांनी लसीकरण पूर्ण केले आहे. ही आकडेवारी केवळ १३ टक्के एवढी झाली आहे. मागील दहा दिवसांपासून जिल्ह्यात १८ ते ४४चे लसीकरण सुरू झाले आहे. मात्र अद्याप त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने दिसून आले.
परभणी सर्वाधिक, सोनपेठला कमी
आतापर्यंत जिल्ह्यात लसीकरणाच्या बाबतीत परभणी तालुक्यात सर्वाधिक, तर सोनपेठ तालुक्यात सर्वांत कमी लसीकरण झाले आहे. आरोग्य विभागाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.