जिंतूर, सेलू तालुक्यांतील शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज वाटप करण्यास टाळाटाळ केली जात आहे. नवीन पीक कर्जधारक तसेच जुने परंतु वाढीव कर्जधारक कर्जापासून वंचित राहिले आहेत. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची मोठी मागणी असतानाही बँकेतील अधिकारी, कर्मचारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अनेक वेळा पुढील महिन्यातील तारखा देऊन एक वर्षापेक्षा अधिक काळापर्यंत प्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहेत. पीक कर्जाबरोबरच उद्योग व्यवसायासाठी बेरोजगारांनाही कर्ज उपलब्ध करून दिले जात नाही. तेव्हा याप्रकरणी तालुक्यातील पीक कर्ज आणि इतर कर्ज तत्काळ वाटप करावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी माजी आमदार विजय भांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय चौधरी, सभापती रामभाऊ उबाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मनोज थिटे, ज्ञानेश्वर ताठे, वंदना इलग, सुमनबाई गाडेकर, शरद मस्के, प्रसाद बुधवंत, मनोज राऊत, उपसभापती आनंदराव डोईफोडे, जिल्हा परिषद सदस्य उज्वलाताई राठोड, अशोक काकडे, राजेंद्र लहाने, नमिता बुधवंत आदी उपस्थित होते.
जिंतूर, सेलू तालुक्यातील पीक कर्ज वाटप करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:24 AM