परभणी : ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका उपोषणकर्त्या ग्रामस्थाने स्वतःचीच तिरडी तयार करून व सरण रचून त्यावर झोपून आज सकाळपासून अनोखे आंदोलन सुरू केले आहे.
गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा उपोषणकर्ते तानाजी गुट्टे यांचा आरोप आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, असा त्यांचा आरोप आहे. याबाबत पुरावे दाखल करुनही कारवाई होत नसल्याने स्वराज्य महिला संघटनेच्या माध्यमातून मंगळवारपासून तानाजी गुट्टे यांच्यासह संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा वनिताताई गुट्टे, शकुंतला नागरगोजे, सुधाकर कापसे आदींनी हे उपोषण सुरु केले आहे. ग्रामसेवकास निलंबित करावे, अशीही त्यांची मागणी आहे. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 8.30 वाजता त्यांनी स्वतःचीच तिरडी तयार करून सरण रचून त्यावर तानाजी गुट्टे स्वतःच झोपले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.