गंगाखेड शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शनिवार बाजार व डॉक्टर लेन बँक शाखेमध्ये खात्यावर पैसे भरण्यासाठी व काढण्यासाठी व्यापारी, तसेच बँक ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. बँकेने वीस हजार रुपयांपुढील व्यवहार बँकेत व त्या खालील व्यवहार ग्राहक सेवा केंद्रावरून करण्याची अट घातली आहे, तरीही ही बँकेतील गर्दी कमी होत सल्याची स्थिती आहे. बँक भरणा करण्यासाठी ग्राहकांना तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. कोरोनाच्या स्थितीत बँकेतील व परिसरातील गर्दी टाळण्यासाठी शहरात ग्राहकांना त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याबरोबर पैसे काढणे, अन्य खात्यावर पैसे वर्ग करणे आदी सुविधा उपलब्ध असलेली एटीएम डिपॉझिट मशीन बसविण्याची मागणी ग्राहक व व्यापाऱ्यांमधून होत आहे. गंगाखेड शहरातील व्यापारी, लोकप्रतिनिधी व बँक ग्राहकांनी एटीएम डिपॉझिट मशीन बसविण्याची मागणी केल्यास, त्यानुसार एटीएम डिपॉझिट मशीन बसविण्यासह मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात येईल, असे भारतीय स्टेट बँकेच्या डॉक्टर लेन शाखेचे व्यवस्थापक जयराम अनमपल्ली यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
गंगाखेडमध्ये डिपॉझिट मशीन बसविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:14 AM