कौसडी-बोरी रस्त्याची दुरवस्था
बोरी : जिंतूर तालुक्यातील बोरी-कौसडी या ५ किमी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे जागोजागी खड्डे निर्माण झाले आहेत. त्याचबरोबर, या रस्त्यावरून जड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची जि.प. शाळेला भेट
हिस्सी : सेलू तालुक्यातील हिस्सी येथे लोकसहभागातून जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन वर्गखोल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. यासाठी जवळपास ८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. यासह इतर सुविधा पाहण्यासाठी शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी शाळेला भेट दिली. यावेळी केंद्रप्रमुख अरुण वैद्य यांची उपस्थिती होती.
शॉर्टसर्किटने शेतकऱ्याचे नुकसान
परभणी : तालुक्यातील उजळंबा येथे परभणी-उमरी या रस्त्यावर शॉर्टसर्किट होऊन माधवराव साखरे यांच्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनेचा पंचनामा करावा, अशी मागणी आहे.
जॉब कार्डसाठी लाभार्थ्यांची धावपळ
परभणी : पंतप्रधान आवास योजना प्रपत्र ड अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी केंद्र शासनाने लाभार्थ्याला जॉब कार्ड अनिवार्य केले आहे. त्यामुळे या जॉब कार्डची प्रत जोडण्यासाठी लाभार्थ्यांची ग्रामीण भागात धावपळ सुरू आहे.
‘१५ वित्त आयोगातील कामांची चौकशी करा’
परभणी : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये १५व्या वित्त आयोगाच्या निधीअंतर्गत कामे सुरू आहेत. काही गावांमध्ये काम पूर्ण झाली आहेत. मात्र, ही कामे करताना प्रशासनाचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पंधराव्या वित्त आयोगातील कामांची चौकशी करावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांतून होत आहे.
दुधना नदीतून अवैध वाळू उपसा सुरू
परभणी : तालुक्यातील दुधना नदीपात्रातून मागील अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या थातुरमातुर कारवाईला हे वाळू माफीया जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.
पाणंद रस्ता योजनेचे प्रस्ताव धूळ खात
परभणी : शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी राज्य शासनाने पालकमंत्री पाणंद रस्ता योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींनी जिल्हा प्रशासनाकडे दाखल केलेले प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. या प्रस्तावावर कोणतीच कारवाई होत नाही.
काम रखडल्याने वाहनधारक हैराण
परभणी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कारला-कुंभारी या रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र, मागील महिनाभरापासून या रस्त्यावर गिट्टी अंथरण्यात आली आहे. त्यावर डांबर न टाकण्यात आल्याने वाहनधारक व शेतकऱ्यांना ये-जा करताना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत.
उपाययोजना करण्यास प्रशासन उदासीन
परभणी : तालुक्यातील आर्वी येथे कोरोनाचे २० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. उपाययोजनांसंदर्भात ठोस पावले उचलत नाही.
रस्त्याचे काम अर्धवट; ग्रामस्थ हैराण
परभणी : तालुक्यातील आर्वी फाटा ते गोविंदपूर वाडी या रस्त्याचे काम संबंधित गुत्तेदाराने अर्धवट केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना व ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.