परभणी : अतिवृष्टीमध्ये शहरातील हडको, विश्वास नगर परिसरात कालव्याचे पाणी शिरून घरांचे नुकसान झाले. ही बाब लक्षात घेता या परिसरातील नागरिकांचे कायमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
११ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये प्रभाग क्रमांक ३ मध्ये विश्वास नगर, हडको परिसरातील घरांत जायकवाडीच्या डाव्या कालव्याचे पाणी शिरून अनेकांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तसेच तात्पुरती डागडुजी करावी लागली. दरवर्षी हा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या नुकसानीची पाहणी केली. परंतु, अद्यापपर्यंत येथील रहिवाशांना आर्थिक मदत मिळाली नाही. पाटबंधारे विभाग नाहरकत प्रमाणपत्र देत नसल्याने येथील नागरिक घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. तेव्हा येथील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आलमगीर खान, सुमीत जाधव, एन.डी. खंदारे, अशोक पोटभरे, कलीम खान, संदीप खाडे, बाबासाहेब भराडे आदींनी केली आहे.