गुड मॉर्निंग पथक नावालाच
गंगाखेड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेच्या वतीने शौचालय बांधकामासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र शहरातील लोटा बहाद्दरांची संख्या काही केल्या कमी होत नाही. त्यामुळे लोटाबहाद्दरांवर कार्यवाहीसाठी स्थापन केलेल गुड मॉर्निंग पथक नावालाच उरल्याचे दिसत आहे.
शहराला दूषित पाणीपुरवठा
गंगाखेड : येथील नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मागील महिनाभरापासून दूषित पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्याचे दिवस असतानाही आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. त्यातही नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे शुद्ध पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शालेय साहित्याचे वाटप
गंगाखेड : देहदान चळवळीची प्रेरणा घेऊन सूर्यमाला मोतीपवळे यांनी धार्मिक विधी व संस्कार न करता १० मार्च रोजी महापुरुषांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकांचे वाटप करून आगळावेगळा सामाजिक संदेश दिला. यावेळी आप्पाराव मोरताटे, किशन वळसंगीकर, मंजूषा जामगे, गोपी मुंडे, बाबासाहेब वाघमारे, प्रकाश शिंगाडे, पिराजी कांबळे, सुनीता घाडगे, आनंद शिंदे, दामोधर जोंधळे, सीताबाई खवडे, वेणू जोगदंड, निर्मला भालके आदींची उपस्थिती होती.
आर्थिक मदत करण्याची मागणी
गंगाखेड : शहरात रस्त्याच्या कडेला पाल टाकून शेती औजारे तयार कुुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या घिसाडी समाजावर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात येत असलेल्या लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने घिसाडी समाजाला उदरनिर्वाहसाठी तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी विनायक सोळंके यांच्यासह घिसाडी समाजातून होत आहे.
महाराष्ट्र संघाला कांस्यपदक
पाथरी : टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित पाचव्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धा ९ ते १४ मार्च या कालावधीत पार पडली. यामध्ये महाराष्ट्र संघास कांस्यपदक मिळाले आहे. या संघामध्ये जिंतूर येथील शेख अमन जिंतूरकर, शेख मोहम्मद युसूफ, शेख सोहेल, मोहम्मद आयेश, शुभम भदर्गे, आराफत बागवान, इम्रान खान, शेख इनायत आदी खेळाडूंचा समावेश होता.