परभणी : कोरोनाबाधित रुग्णांसाठी दररोज १ हजार रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होत असताना प्रत्यक्षात पुरवठा मात्र ५०० इंजेक्शनचाच होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ अद्यापही थांबलेली नाही.
मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. दररोज ७०० ते ८०० रुग्ण नोंद होत असल्याने या रुग्णांवर उपचार करताना आरोग्य विभागाची कसरत होत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचे नातेवाईक त्रस्त आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनबरोबरच जिल्ह्यात ऑक्सिजनचाही तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हा प्रशासनाने मोठे प्रयत्न करून जिल्ह्यासाठी ऑक्सिजन उपलब्ध करून घेतला. आता तीन दिवस पुरेल एवढा ऑक्सिजन साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा प्रश्न सुटला असला तरी रेमडेसिविरचा तुटवडा रुग्णांच्या नातेवाइकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन द्यावे लागते. मध्यंतरी या इंजेक्शनचा काळाबाजार वाढल्याने प्रशासनाने ही यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेतली आहे; परंतु तरीही पुरवठा कमी होत असल्याने नातेवाइकांची गैरसोय कायम आहे. जिल्ह्यात खासगी रुग्णालयांकडून दररोज १ हजार रेमडेसिविरच्या इंजेक्शनची मागणी नोंदविली जात आहे. मात्र प्रत्यक्षात जिल्ह्यासाठी ४०० ते ५०० इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करताना आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात दररोज कमी-अधिक प्रमाणात इंजेक्शन पुरवठा होत आहे. परंतु मागणी एवढे इंजेक्शनची उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यात या इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळीच संपला साठा
रविवारी जिल्ह्यासाठी रेमडेसिविरचे सुमारे ५०० इंजेक्शन प्राप्त झाले होते. त्यापैकी शिल्लक असलेले १८० इंजेक्शन सोमवारी सकाळी मागणीप्रमाणे वाटप करण्यात आले. त्यामुळे सकाळपासूनच जिल्ह्यात हे इंजेक्शन उपलब्ध नसून आता नवीन साठा कधी उपलब्ध होतो, याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
२० हजार इंजेक्शनची मागणी कंपन्यांकडे प्रलंबित
जिल्ह्यातील विविध कोविड रुग्णालयांमधून होत असलेली मागणी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या सात वेगवेगळ्या कंपन्यांकडे सुमारे २० हजार इंजेक्शनची मागणी नोंदविली आहे; परंतु या कंपन्यांनी अद्याप इंजेक्शनचा पुरवठा केला नाही. जिल्हा प्रशासन या कंपन्यांकडे सतत पाठपुरावा करीत आहे. वरिष्ठ पातळीवरूनच इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होत आहे.
जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र साठा उपलब्ध
येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून रेषेवर इंजेक्शनची स्वतंत्र मागणी नोंदवली जात नसल्याच्या तक्रारी आहेत खासगी दवाखाना साठी औषधी विक्रेत्यांनी नोंदविलेल्या मागणी यातूनच जिल्हा रुग्णालयासाठी इंजेक्शनचा पुरवठा केला जात होता त्यामुळे खासगी रुग्णालयांचा प्रश्न निर्माण होत असेल ही बाब औषधविक्रेत्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर आधार जिल्हा रुग्णालयाने ही स्वतंत्र मागणी नोंदविली आहे. या मागणीनुसार जिल्हा रुग्णालयासाठी एमपीएससीवरील इंजेक्शनचा औषधी साठा उपलब्ध झाला आहे.