यासंदर्भातील निवेदनात म्हटले आहे की, परभणी शहरात वस्तीमध्ये धार रोड भागात असलेला मनपाचा कचरा डेपो पूर्णपणे अनधिकृत असून यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. शहरातील कचरा डेपोसाठी गंगाखेड रोडवर बोरवंड येथे २००७ मध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतरही धार रोडचा कचरा डेपो हटविण्यात आलेला नाही. या कचरा डेपोच्या दुर्गंधीचा त्रास या भागातील नागरिकांना होत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही मनपाने कचरा डेपो बंद केलेला नाही. त्यामुळे हा कचरा डेपो तातडीने हटविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, बालासाहेब तरवटे, शिवाजी चव्हाण, नारायण ढगे, ज्ञानेश्वर पंढरकर, नकुल होगे, श्याम भोंग, मंगेश वाकोडे, गजानन तरवटे आदींची नावे आहेत.
अनधिकृत कचरा डेपो हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:22 AM