जुलै महिन्यात जिल्ह्यात दोन वेळा अतिवृष्टी झाली. अनेक भागांतील पिके पाण्याखाली गेली. तसेच काही ठिकाणी पूर परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस ही प्रमुख पिके बेचिराख झाल्याने शेतकरी संकटात सापडले होते. या नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा महसूल प्रशासनाने केला असून बाधित पीक क्षेत्राची नोंद घेण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ६६ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात ६५ हजार ५०६ हेक्टर क्षेत्रावरील जिरायती पिके असून, ५४९ हेक्टरवरील बागायती तर ६९.८० हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने तयार केला आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने ४५ कोटी ४१ लाख २७ हजार रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे नोंदविली आहे. ही रक्कम प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत वितरित केली जाणार आहे.
परभणी, जिंतूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिंतूर आणि परभणी या दोन तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. ११ जुलै रोजी परभणी तालुक्याच्या परिसरात अतिवृष्टी झाली होती. ढगफुटीसदृश या पावसाने अनेक शेतांमध्ये पाणी शिरले होते. तसेच २२ व २३ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत जिंतूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार परभणी तालुक्यात ३० हजार ३८६ हेक्टर तर जिंतूर तालुक्यात २२ हजार १३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.
सहा हजार आठशे रुपयांप्रमाणे मागणी
अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने जिरायती पिकासाठी ६ हजार ८०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर आणि फळपिकांसाठी १८ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे शासनाकडे निधीची मागणी नोंदविण्यात आली आहे.
तालुकानिहाय नोंद केलेली मागणी
परभणी २०९५.८७
जिंतूर १५१९.८७
पाथरी ४.४७
सोनपेठ १०.८८
पालम ४००.१८
पूर्णा ५१०.००
एकूण ४५४१.२७
रक्कम कोटीत