परभणी जिल्ह्यातील १६४ आरोग्य उपकेंद्राचे रूपांतर आरोग्यवर्धिनी केंद्रात करण्यासाठी शासनाने प्रत्येकी सात लाख रुपये याप्रमाणे साडेअकरा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या कामांचे स्वतंत्र अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यामुळे गावनिहाय कामांची स्वतंत्र ई-निविदा काढणे आवश्यक असताना औरंगाबाद येथील पायाभूत सुविधा विकास कक्षाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कामे एकत्र करून गंगाखेड, सोनपेठ, पालम व परभणी या चार तालुक्यातील ४० आरोग्य उपकेंद्रांची एकत्रित निविदा काढली. त्याचा फटका स्थानिक कंत्राटदारांना बसणार आहे. त्यामुळे ही निविदा रद्द करून गावनिहाय कामांची निविदा काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा जिल्हा कंत्राटदार संघटनेचे मधुसूदन लटपटे, शेख खाजा, विठ्ठल मुंडे, मनोहर व्हावळे, आदींनी दिला आहे.
गावनिहाय निविदा काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 4:15 AM