परभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना १ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास गायकवाड यांच्या कक्षातच एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.
रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांच्याकडे भूसंपादन विभागाचा अतिरिक्त पदभार आहे. दरम्यान, तक्रारकर्त्याने २० फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. पाझर तलावात ज्या शेतकर्यांची जमीन संपादित झाली आहे, त्या कामाचा मावेजा शेतकर्यांना देण्यासाठी संयुक्तीक अहवाल पाठविण्यासाठी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड हे २ लाख रुपयांची लाच मागत असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २० फेब्रुवारी रोजी सापळा लावला. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पंचासमक्ष उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी तक्रारकर्त्याकडे तडजोडी अंती १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली आणि त्यांच्या कक्षातच ही रक्कम स्वीकारली. त्यावेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात सुदर्शन गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक एन.एन.बेंबडे, पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, हवालदार लक्ष्मण मुरकुटे, जमील जहागीरदार, सचिन गुरसुडकर, शेख मुखीद, अनिल कटारे, अविनाश पवार, माणिक चट्टे, सारिका टेहरे, भालचंद्र बोके, रमेश चौधरी यांनी केली. पोलीस उपाधीक्षक बेंबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.