परभणी : तालुक्यातील पिंपळगाव टोंग आणि सावंगी येथे छापा टाकून उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी १२ ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. गुरुवारी पहाटे ३ वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली.
तालुक्यातील ग्रामीण भागात नदीपात्रातील वाळू उपसा करून त्याचा साठा केला जात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांना मिळाली. या माहितीच्या आधारे १७ जून रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने सावंगी येथे जाऊन पाहणी केली असता वाळूचा ४ ब्रास अवैध साठा दिसून आला. तो जप्त करण्यात आला. त्याचप्रमाणे पिंपळगाव टोंग येथे एका मठाच्या बाजूला ८ ब्रास वाळूचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणीही छापा टाकून वाळू जप्त करण्यात आली. दरम्यान जप्त केलेल्या वाळू प्रकरणी पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी सांगितले.
ही कारवाई कुंडेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मंदार इंदुरकर, अव्वल कारकून गजानन अन्नपूर्वे, मोरे, गिरी यांच्या पथकाने केली. जिल्ह्यात सध्या वाळू घाटांचे लिलाव झाले नसल्याने वाळूची तस्करी वाढली आहे. खुल्या बाजारपेठेत ८ हजार रुपये ब्रास या दराने वाळू विक्री केली जात आहे.