परभणी : येथील जिल्हा परिषदेत सुंदर माझे कार्यालय हा उपक्रम राबविला जात असून, विभागीय आयुक्त कार्यालयातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी १२ जानेवारी रोजी जिल्हा परिषद सभागृहात बैठक घेऊन या मोहिमेचा आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसार २८ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या काळात जिल्हा परिषदेच्या विविध कार्यालयात सुंदर माझे कार्यालय हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत १२ जानेवारी रोजी उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. विभागीय उपायुक्त सुरेश बेदमुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुहास विसपुते यांच्यासह सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी आणि तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
सदर बैठकीत उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत कार्यालयीन स्वच्छता व अनुषांगिक बाबी, प्रशासकीय बाबी आणि कर्मचारी वैयक्तिक बाबी या तीन विषयांच्या दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदअंतर्गत अभिलेख वर्गीकरण व कार्यालय स्वच्छता मोहीम सुरू केल्याबद्दल बेदमुथा यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यालयांत मोहिमेला प्रारंभ
परभणी जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभाग, पंचायत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अर्थ विभाग, कृषी विभाग, आरोग्य, शिक्षण या विभागांसह तालुकास्तरावरील पंचायत समिती कार्यालयात सुंदर माझे कार्यालय मोहीम राबविली जाणार आहे.