जिंतूर (परभणी) : हॉटेल मध्ये ऑर्डर लवकर मागणे एकाच्या जिवावर बेतले आहे. लवकर नाश्ता का मागतो? हॉटेल तुझ्या बापाची आहे का? असे म्हणत हॉटेल मालक आणि वेटर यांच्या बेदम मारहाणीत ग्राहकाचा जिंतूर शहरात मृत्यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह चौघांना जिंतूर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत शेख अफसर शेख खाजा यांनी जिंतूर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, शेख अजगर शेख खाजा हा जिंतूर येथे हॉटेल सपना या ठिकाणी आज सकाळी नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी आला होता. लवकर नाष्टा देण्याची मागणी शेख अजगर याने केली. यामुळे त्याचा हॉटेल मालक आणि वेटर यांच्यासोबत वाद झाला. यातून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, अमोल लक्ष्मणराव आव्हाड आणि वेटर बालाजी पांडुरंग रणखांबे व इमरान बन्याभाई कुरेशी यांनी तू लवकर नाश्ता का मागतो ? तुझ्या बापाची हॉटेल आहे का? जसा आम्हाला जमेल त्यावेळेस आम्ही देऊ? असे सुनावले. मात्र, शेख अजगर आणि हॉटेल चालक, वेटर यांच्यातील वाद एवढा विकोपाला गेला. संतापलेल्या हॉटेल मालक आणि वेटर यांनी मोठ्या लाकडाने शेख अजगर यास जोरदार मारहाण केली. यात अजगर याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची वार्ता पसरताच हॉटेल समोर मोठा जमाव जमा झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी तत्काळ जिंतूर गाठले. दोन्ही बाजूच्या जमावाला शांत करून सर्व आरोपींना तात्काळ अटक केली.
या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात शेख अफसर शेख खाजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेषराव लक्ष्मणराव आव्हाड, अमोल लक्ष्मणराव आव्हाड आणि वेटर बालाजी पांडुरंग रणखांबे व इमरान बन्याभाई कुरेशी यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील चारही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.