परभणी : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे करण्यासाठी नियोजन समितीतून ५ टक्के निधी वापरण्यास परवानगी दिल्यानंतरही जिल्ह्यात ही कामे ठप्प आहेत.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सुमारे साडेतीनशे कामे दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. मागील वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. कोरोनाच्या संसर्गामुळे निधीअभावी जिल्ह्यातील सर्वच रस्त्यांची कामे ठप्प पडली होती. या कामांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने नियोजन समितीतील ५ टक्के निधी वापरून अतिवृष्टीने खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात आता परत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असतानाही या रस्त्यांच्या कामांना सुरुवात झाली नाही. सध्यातरी ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे ठप्प असून, ग्रामस्थांना खड्डेमय रस्त्यांवरूनच प्रवास करावा लागत आहे.