सोयाबीन भाववाढीचा आनंद
पालम: शहरातील नवा मोठा बाजारपेठेत सोयाबीनची भाववाढ होत असल्याने शेतकरीवर्गात आनंदी वातावरण पसरले आहे. त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आणले जात आहे ४ हजार ६०० च्या आसपास खरेदी केली जाते आहे. मागील महिनाभरात दररोज सोयाबीनचे भाव वाढत आहेत. त्यामुळे साठा करून ठेवलेले सोयाबीन जोरात विक्री करण्यात येत आहे.
सरपंचाची रेलचेल झाली सुरू
पालम: तालुक्यात ५३ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचाच्या निवडी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे गावातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी पंचायत समितीमध्ये सरपंच व उपसरपंच यांची रेलचेल वाढली आहे. गावात निवडणूक काळात दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
उसाच्या वाहनाने वाढले खड्डे
पालम: शहरासह ग्रामीण भागात उसाची तोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ऊस साखर कारखान्याकडे नेणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडत आहेत. त्यामुळे इतर वाहनांना अडचणी निर्माण होत आहेत.
आरोग्य यंत्रणा गाफील
पालम: तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या उपकेंद्रावर कार्यरत कर्मचारी कामाला दांडी मारीत आहेत. कागदी घोडे नाचवत आरोग्य यंत्रणा गाफील राहत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारी कर्मचारी गाफील पणा नागरिकांना त्रासदायक होत आहे.
मोडकळीस वर्गखोल्या पाडण्याकडे दुर्लक्ष
पालम: तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या जुन्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या खोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. मोडकळीस आलेल्या खोल्या पाडण्याकडे जिल्हा परिषद यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. शाळास्तरावरून प्रस्ताव देऊनही लक्ष दिले जात नाही. त्यामुळे तालुक्यात तातडीने जिल्हा परिषदने धोकादायक खोल्यांची पाहणी करून त्या खोल्या पाडण्याची परवानगी देण्याची आवश्यकता आहे.