परभणी : स्मशानभूमीच्या जागेसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करीत असलेल्या देवला पूनर्वसन येथील स्मशानभूमीचा वाद आज परत एकदा ऐरणीवर आला. एका वृद्धाच्या अंत्यसंस्कार करण्याच्या वेळी आज सकाळी महसूळ प्रशासन व ग्रामस्थांमध्ये खडाजंगी झाली. मात्र , ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर ठाम राहत वादातील गट नंबर २३५ या जागेवरच वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात आले व स्मशानभूमीसाठी चालू असलेला संघर्ष त्यांनी कायम ठेवला आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या सातोना रोडवरील देवला पूनर्वसन येथे स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी या प्रश्नावर लढा सुरू केला होता. २० जुलै रोजी आश्रोबा पंडूरे या मयतावर संतापलेल्या ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या जागेची मागणी करीत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले होते. त्यामुळे देवला येथील स्मशानभूमीचा राज्यभर चर्चेत आला होता. त्यानंतरही प्रशासनाने स्मशानभूमीच्या जागेसाठी तत्परता न दाखविल्यामुळे शुक्रवारी पुन्हा एकदा संघर्ष शिगेला पोहचला. शुक्रवारी पहाटे देवला पूनर्वसन येथील सुंदर हरिभाऊ शेळके (वय ९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करावेत? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे निर्माण झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी ुपुन्हा एकदा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निश्चिय केला होता.
ही माहिती महसूल विभागाला मिळताच सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तहसीलदार स्वरुप कंकाळ, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी देवला येथे जाऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच गट नं. २३५, २३६ या जागेची पाहणी केली. ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी पूर्वी असलेली गट नं. २३५ ची जागा मिळावी, अशी अग्रही भूमिका घेतली. मात्र प्रशासनाकडून २३६ मध्ये जागा दिली जाईल, असे सांगण्यात आले. यावर ग्रामस्थ आणि महसूल अधिकारी यांच्यात चांगलीच चर्चा झडली. त्यानंतर या प्रकरणी दुपारपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे सहाय्यक जिल्हाधिकारी कर्डिले यांनी ग्रामस्थांना सांगितले. परंतु, शुक्रवारी दुपारी एक वाजेनंतरही निर्णय न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर गट नं. २३५ मधील संरक्षण भिंत पाडून मयत सुंदर शेळके यांच्या पार्र्थिवावर अंत्यसंस्कार केले. यावेळी लालसेनेचे गणपत भिसे, अशोक उफाडे, जि.प. सदस्य राजेंद्र लहाने, गटनेते राम खराबे पाटील, गुलाबराव लाटे, अंकूश मिसाळ, रणजित गजमल, सभापती पुरुषोत्तम पावडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थ झाले आक्रमकसुंदरराव शेळके यांचा अंत्यविधी कोठे करावा? असा प्रश्न पुन्हा एकदा देवला ग्रामस्थांसमोर उभा राहिला. तहसील कार्यालयाच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत असलेल्या ग्रामस्थांशी महसूल अधिका-यानी गावात जाऊन चर्चा केली. मात्र बारा वर्षापासून हा प्रश्न सुटत नसल्याने महिला व ग्रामस्थांनी महसूल अधिका-यांसमोर आपला संताप व्यक्त केला. गट नं. २३५ मधील जुनीच जागा देण्याची मागणी केली. ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे पाहताच अधिका-यांनी देवला येथून काढता पाय घेतला. अखेर गट नं. २३५ मध्येच शेळके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून ग्रामस्थांनी संघर्ष सुरूच ठेवला.