परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने पिकांवर फवारणी करण्यासाठी बुम स्प्रेअर हे डिजिटल यंत्र तयार केले असून, त्याचा शेतीत वापर सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे श्रम वाचले आहेत.
शेतीमध्येडिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या उद्देशाने येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ‘कृषी उत्पादकता वाढीसाठी यंत्रमानव ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ.गोपाळ शिंदे यांनी सांगितले, मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांना ड्रोनच्या साह्याने फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी ड्रोनची मागणी नोंदवली आहे. मात्र, संचारबंदीमुळे हे ड्रोन शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष वापर सुरू झालेला नाही. मात्र, याच विभागाने शेतकऱ्यांंसाठी डिजिटल तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पी.एचडी.चे विद्यार्थी आणि संशोधकांनी बूम स्प्रेयर हे यंत्र विकसित केले आहे.
इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे हे यंत्र असून ते सौर ऊर्जेवर चालते. एका तासात अडीच हेक्टरवर फवारणी करता येते. शिवाय या यंत्रावर प्रकाश व्यवस्था, मोबाईल चार्जिंग तसेच संगीत ऐकण्याची व्यवस्थाही केली आहे. हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यात कास्तकारांची नियुक्ती केली आहे. हे कास्तकार यंत्राची निर्मिती करीत असून शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे फवारणी करणे सोयीचे झाले. भविष्यात या यंत्राला जीपीएसच्या साह्याने स्वयंचलित केले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
रिमोटवरील लसूण पेरणी यंत्रपरभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील डिजिटल शेती तंत्रज्ञान विभागाने रिमोटवर चालणारे डिजिटल पेरणी यंत्र पेपर पॉट चैन मेकॅ निझम या तंत्रावर विकसित केले आहे. या यंत्राद्वारे एका मिनिटात २६५ रोपे लावता येतात. सौर ऊर्जेचा वापर केल्याने इंधनाचीही बचत होते. 100 मीटरपर्यंत रिमोट कंट्रोल कार्य करते. गादीवाफ्यावर चांगल्या पद्धतीने पेरणी करता येते, असे गोपाल शिंदे यांनी सांगितले. सध्या हे यंत्र शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी मर्यादित आहे. ते पूर्ण विकसित झाल्यानंतर शेतकऱ्यांंना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे डॉ. गोपाळ शिंदे यांनी सांगितले.