परभणी : गेल्या काही दिवसापासून राज्यात सूडबुद्धीचे राजकारण पेरल्या जात असून बड्या नेत्यांकडून कटकारस्थाने रचली जात आहे. पहाटेच्या शपथविधीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कल्पना होती, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले आहे. परंतु त्यांचे हे वक्तव्य ऑफ कॅमेरा असल्याची चित्रफिती पुढे आल्याने त्यांनी ऑफ नव्हे तर ऑन कॅमेराच बोलावं, असा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांच्यावर परभणीतील मंगळवारी झालेल्या पत्रपरिषदेत केला.
राज्यातील राजकारण सध्या वेगळ्या वळणावर जात आहे. पवारांवर टीका केल्याशिवाय चर्चेत राहता येत नाही, असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस राज्यातील महत्त्वाचे प्रश्न सोडून पवार यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करत आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांची संमती होती, असे वक्तव्य केले आहे. परंतु या वक्तव्याचे चित्रफिती पाहिली असता त्यात त्यांनी हे मी ऑफ कॅमेरा सांगतोय, असे दिसून येत असल्याचे सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे फडणवीस यांनी ऑफ कॅमेरा बोलण्यापेक्षा ऑन कॅमेरा जे काही असेल ते सत्य बोलावे आणि राज्याला खरी काय ती परिस्थिती सांगावी, असे आव्हान त्यांनी फडणवीसांना दिले.
सुसंस्कृतपणा घालवलादेवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुसंस्कृतपणा आणि विकासात्मक चेहरा म्हणून आम्ही पाहत होतो. परंतु अलीकडच्या काळात त्यांची प्रतिमा पूर्णतः बदलली आहे. विकासात्मक बाबीवर चर्चा, वादविवाद होणे अपेक्षित असते. मात्र, गेल्या काही दिवसापासून सूडबुद्धीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राच्या विकासाची वाताहत होत असल्याचा आरोप सुळे यांनी फडणवीस यांच्यावर केला.
घोषणांचा पाऊस, निधीचा दुष्काळकेंद्र सरकारने नुकतीच बजेटची मांडणी केली. यात नागरिकांसाठी विविध घोषणांचा पाऊस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाडला. परंतु त्या योजना प्रत्यक्षात साकारण्यासाठी त्यासाठी लागणाऱ्या बजेटची तरतूदच केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे घोषणा केल्या मात्र त्याची पूर्तता होणार नसल्याची स्थिती आहे.
सरकारकडून सूडाच्या राजकारणाला खतपाणीगेल्या काही दिवसापासून केंद्र आणि राज्य सरकार सूडाच्या राजकारणाला खतपाणी घातले जात आहे. विकासात्मक बाबीला बाजूला ठेवून सत्ता समीकरणाची गणिते जुळवली जात असल्याने केंद्र आणि राज्य सरकारकडून नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सर्व सामन्यांचे प्रश्न, समस्या, बेरोजगारी यावर बोलायला सरकारला वेळ नाही. महागाईचा उच्चांक १०.१ वर पोहोचला असून गेल्या दहा वर्षात महागाईने उच्चांक गाठला आहे. ईडी (शिंदे-फडणवरस) सरकार विकासात्मक मुद्दे बाजुला ठेऊन सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप सुळे यांनी पत्रपरिषदेत केला.