बोरी : जिंतूर तालुक्यातील कुंभारी येथे जन्मदात्या बापानेच पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सतत दीड वर्ष अत्याचार केल्याची घटना दिनांक 14 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. अत्याचाराच्या भीतीने मुलीने घरातून पलायन केल्यानंतर वडील-मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा उलगडा पोलिसांना झाला.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कुंभारी येथील महादेव दत्तराव सवंडकर वय 35 वर्षे यांनी बोरी पोलीस ठाण्यामध्ये 11 ऑगस्ट रोजी आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवून ही मुलगी पिंपळगाव गायके येथे एका शेतकऱ्याच्या आखड्यावर असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बीट जमदार बी डी शिंदे, अमोल शेंडगे, अरुण पंचांगे, यशवंत कुटे या पथकाने त्या अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन बोरी पोलीस ठाण्यामध्ये आणले.
यावेळी मुलीची चौकशी केली असता मुलीने सांगितले की, वडील माझ्यावर गेल्या दीड वर्षापासून अत्याचार करत आहेत, या भीतीपोटी मी घरून निघून गेले होते. मुलीच्या फिर्यादीवरुन वडील महादेव दत्तराव सवंडकर याच्यावर कलम 376 पोस्को कायदा अंतर्गत बोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विवेकानंद पाटील हे करीत आहेत.