- असगर देशमुखचारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जि.प.उर्दु प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी सोमवारी बोलवण्यात आलेल्या बैठकीत शासकीय परिपत्रकानुसार पदाधिकारी निवडीवरुन गदारोळ निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तात निवड प्रक्रिया पार पडली.
जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील जि.प.उर्दु प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता संबधित पालकांची बैठक बोलविण्यात आली होती. दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीपर्यत एकुण अकरा सदस्य बिनविरोध निवडण्यात आले. त्यानंतर अध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्षपदासाठी मुबारक काजी यांना १० मते तर शमीम शेख बाबर यांना एका मतावर समाधान मानावे लागले तसेच उपाध्यक्षपदी हनीफा शेख जलील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर शिक्षण प्रेमी, सदस्य निवडण्यासाठी गदारोळ निर्माण झाला. परंतू, शेवटी सय्यद अन्वर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरम्यान, निवड प्रक्रियेत प्रचंड गदारोळ झाल्याने घटनास्थळी पोलीसांना पाचारण करण्यात आले. चारठाणा पोलीस ठाण्याचे गुलाब भिसे, पवन राऊत यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, तीन तासांच्या निवड प्रक्रियेनंतर अध्यक्षपदी मुबारक काजी, उपाध्यक्षपदी हनीफा शेख जलील तर सदस्य म्हणुन सय्यद अझर अली, शहेनाज सलीम काजी, सय्यद खैसर, शेख अफसर, यासमीन शेख रशीद, शेख जावेद, शमीम शेख. बाबर तर शिक्षण प्रेमींमध्ये सय्यद अन्वर यांची निवड करण्यात आली.
आधी गोंधळ, मग जल्लोषअध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर शाळेच्या परिसरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. त्यामुळे या निवडीनंतर गावात आधी गोंधळ झाला, मग जल्लोष केला, अशी चर्चा एकावयास मिळाली.