दोन दिवसांपासून हिस्सी अंधारात
हिस्सी : सेलू तालुक्यातील हिस्सी गावचा वीजपुरवठा थकीत देयकासाठी महावितरण कंपनीने खंडित केला आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून अंधारात आहे.
वीज वितरण कंपनीच्या वतीने मागील महिनाभरापासून वीज देयकाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील ३०० हून अधिक गावांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्याच अनुषंगाने हिस्सी येथील ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेल्या देयकाचा भरणा वेळेत केला नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही यामध्ये सुधारणा झाली नाही. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने हिस्सी येथील वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. जोपर्यंत थकीत बिलाची वसुली होणार नाही. तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी जनार्दन सोनटक्के यांनी सांगितले.
अपघाताच्या घटना वाढल्या
चारठाणा : जिंतूर-जालना या महामार्गावर मागील महिनाभरापासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. रात्री-अपरात्री या रस्त्यावरून वाहनधारक भरधाव वेगाने आपली वाहने चालवीत आहेत. त्यामुळे अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. शुक्रवारी एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ३५ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे याकडे महामार्ग पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वीज वितरण कंपनीविरुद्ध तीव्र संताप
परभणी : जिल्ह्यातील ग्रामीण भागात मीटर रीडिंग घेण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने दहाहून अधिक एजन्सींची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या एजन्सी प्रत्यक्ष ग्राहकांच्या घरी जाऊन रीडिंग घेत नाहीत. मात्र, प्रत्येक महिन्याला अंदाजे बिले पाठविली जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना वापरापेक्षा अधिकची बिले येत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमधून संताप व्यक्त होत आहे.
संदलापूर-कात्नेश्वर रस्त्याची दुरवस्था
पूर्णा : तालुक्यातील संदलापूर ते कात्नेश्वर या रस्त्याची दुरवस्था झाली असून, वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पूर्णा शहर गाठण्यासाठी हा रस्ता जवळचा म्हणून वाहनधारक पसंती देत आहेत. मात्र, रस्त्याची दुरवस्था झाल्याने बांधकाम विभागाविरुद्ध वाहनधारक संताप व्यक्त करीत आहेत.
बांधकामधारक हैराण
देवगावफाटा : एकीकडे वाळू मिळत नसल्याने बांधकामधारक चिंताग्रस्त असताना दुसरीकडे विटांचे भावही ५ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईने बांधकाम करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. बांधकामधारकांच्या अडचणी लक्षात घेता शासनाने वाळू सहज उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत.