जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्कचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर मागील काही दिवसांपासून प्रशासन दंडात्मक कारवाई करीत आहे. परंतु, तरीही या सूचनांचे पालन होत नसल्याने सोमवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी बाजारपेठ भागात फिरून नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले. ज्या नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही, अशा नागरिकांचा गुलाबपुष्प आणि मास्क देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘मी जबाबदार’ या बिल्ल्यांचे वाटप केले. यापुढे मास्कचा वापर केला नाही तर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी यावेळी दिला. शहरातील दर्गा रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, जनता मार्केट, जुना मोंढा, ग्रँड कॉर्नर आदी भागात पायी फिरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही गांधीगिरी केली. प्रशासनाच्या या अनोख्या मोहिमेची शहरात दिवसभर चर्चा होती. दरम्यान, यापुढे जर मास्कचा वापर केला नाही तर कडक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
कोरोनाच्या नियमांसाठी जिल्हाधिकाऱ्यांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:18 AM