पाथरी : तालुक्यात सोमवारी (दि. 23) पहाटे मुसळधार पाऊस पडल्याने पाथरी-आष्टी रस्त्यावरील खेरडा गावातील नाल्याला पूर आला. नाल्यात अचानक तीन ते चार फूट पाणी आल्याने येथील मार्ग बंद पडला. याच दरम्यान शेतातून दूध घेऊन येत असलेली १० ते १५ शेतकरी पुरात अडकली. ग्रामस्थांनी त्यांना वाचविण्यासाठी दुसऱ्या बाजूने दोरी बांधून प्रयत्न केले. मात्र, दोरीच्या सहाय्याने दुसऱ्या टोकाला जाताना एक शेतकरी पाण्यात पडला व पुढे वाहत गेला. सुदैवाने पुढे बंधारा असल्याने शेतकरी त्यात अडकला गेला व सुखरूप बाहेर पडला.
पाथरी तालुक्यातील खेरडा गावापासून खेडूला गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर खेरडा गावापासून अगदी 400 मीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यावर पाथरी आणि मानवत तालुक्यातील पावसाचे पाणी वाहून पुढे रामपुरी मार्गे गोदावरी पात्राला मिळते. सोमवारी पहाटे पाथरी आणि मानवत तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसाचे पाणी खेरडा खेडुळा नाल्याला आले. यामुळे सकाळी 7 वाजता पाण्याचा जोर वाढल्याने येथील पुलावरून 4 फूटवर पाणी वेगाने वाहू लागले. याच दरम्यान, खेरडा येथील काही शेतकरी पहाटे शेतात दूध काढण्यासाठी गेले होते. परत येत असताना ते पुरात अडकून पडले. रस्त्यावरून तीन ते चार फूट पाणी वेगाने वाहत असल्याने शेतकऱ्यांना गावात येता येत नव्हते.
पुरामध्ये काही जण अडकले असल्याची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी पुलाकडे धाव घेतली. दुसऱ्या टोकाकडून दोरीच्या साह्याने शेतकऱ्यांना आणण्याचा ग्रामस्थांनी प्रयत्न केला. याचवेळी ज्ञानोबा बाबुराव उंडे (45) हा शेतकरी दोरीच्या सहाय्याने पाण्यातून दुसऱ्या टोकाकडे येत होता. अचानक उंडे यांचा पाय खड्ड्यात अडकल्याने ते खाली पडले. त्यांच्या हातातील दोरी सुटल्याने ते पुरात वाहत गेले. पुढे ३०० मीटर अंतरावर नाल्यावर बंधारा असल्याने उंडे त्यात अडकले. त्यानंतर उंडे बंधारातून बाहेर पडत गावात सुखरूप परतल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.