परभणी- फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीस अटक करण्यासाठी नाशिकचे पोलीस घरी दाखल होताच आरोपीने चक्क टेरेसवर जाऊन हातात दगडे घेत पोलिसांना धमकावल्याचा प्रकार २३ जुलै रोजी सकाळी ९़३० वाजेच्या सुमारास परभणी शहरातील सिंचन नगर भागात घडला आहे़
या संदर्भात माहिती अशी की, शहरातील सिंचन नगर भागातील एका आरोपीविरूद्ध नाशिक जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे़ वर्षभरापासून हा आरोपी हजर होत नसल्याने मंगळवारी नाशिक जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी आरोपीला पकडण्यासाठी परभणीत आले होते़ हा आरोपी सिंचन नगर भागातील रहिवासी असल्याने नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले़ नानलपेठ पोलीस ठाण्याचे संतोष जाधव, महिला पोलीस कर्मचारी मुलगीर, प्रकाश रेवले यांच्यासह डीबीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन नाशिकचे पोलीस सिंचन नगरात पोहचले़ आपल्याला अटक करण्यासाठी पोलीस आले असल्याची माहिती समजताच या आरोपीने घराच्या टेरेसवर जाऊन हातात दगड घेतले़,' मला अटक करायची नाही, मी स्वत:हून हजर होईल़' असे म्हणत आरोपीने पोलिसांनाच धमकावले. हा प्रकार सुरू असताना परिसरात बघ्यांची गर्दी जमली होती.
दरम्यान, घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन नानलपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी़व्ही़ येवते यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीची समजूत काढली़ त्यानंतर काही वेळाने आरोपी टेरेसवरून खाली उतरला़ त्यास अटक करून नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले़ तेथून पुढे नाशिक पोलिसांच्या हवाली केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली़