पावसाळा सुरू झाला की, या काळात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार बळावतात. सर्वाधिक आजार साचणाऱ्या दूषित पाण्यामुळे पसरतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून शुद्ध पाणी पिणे आवश्यक आहे, तसेच पावसाळ्यात उकळून थंड केलेले स्वच्छ पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी गरम करून वापरल्यामुळे पाण्यातील जंतू नष्ट होतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे विकार या दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबरोबरच सर्दी, खोकला- पडसे यासारखे आजारदेखील जडतात.
दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस यांसारखेही विकार जडतात.
याशिवाय पावसाळ्यात आपली पचनक्रिया मंदावते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
आजाराची लक्षणे
पोटात पेटके येऊन दुखणे व वारंवार जुलाब होणे.
उलटी होणे, लहान मुलांची टाळू खोल जाणे, डोळे खोल जाणे.
सतत तोंड कोरडे पडणे, वजनात घट होणे.
लघवी कमी होणे किंवा लघवीचा रंग बदलणे.
जुलाब वा उलट्यांमधून रक्त जाणे
पाणी उकळून प्यायलेले बरे
पाणी उकळून पिणे हा चांगला व सोपा उपाय आहे. दहा मिनिटे पाणी उकळून थंड झाल्यावर पिंपात भरून ठेवल्यास ते पाणी प्यायल्यावर पाण्यातील जंतूपासून होणारे कोणतेही आजार होणार नाहीत.
१० दिवसांतून एक वेळ परभणीकरांना पाणी
परभणीसाठी नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली तरी पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही.
शहराला सध्या १० दिवसांतून एक वेळा पाणी मिळत आहे. जुन्या पाईपलाईनमधूनही पाणीपुरवठा सुरू आहे. या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे अधिक काळजीची गरज आहे.