देवगावफाटा (ता. सेलू) : अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन परीक्षेत सेलू येथील सौरभ श्रीनिवास कुलकर्णी या विद्यार्थ्याने १०० पर्सेंटाईल मिळवले असून, यामुळे सेलू शहराचा नावलौकिक राज्यभरात वाढला आहे. १०० पर्सेंटाईल मिळवणारे राज्यात ५ तर देशात ४४ विद्यार्थी असून, त्यात सौरभचा समावेश झाला आहे.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमार्फत जेईई मेन परीक्षेच्या चौथ्या सत्राचा निकाल १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री जाहीर झाला. यामध्ये शंभर पर्सेंटाईल मिळवणारे देशात ४४ विद्यार्थी आहेत. त्यापैकी राज्यातील मुंबई येथील ४ व सेलू येथील डॉ. श्रीनिवास कुलकर्णी व डॉ. कल्पना कुलकर्णी यांचा मुलगा सौरभ श्रीनिवास कुलकर्णी याने स्थान पटकावत सेलू शहराचा नावलौकिक वाढवला आहे. जेईई प्रवेश पात्रता परीक्षा ही खूप काठिण्य पातळीतील होती.
विशेष करून यावर्षी विद्यार्थ्यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चारवेळा परीक्षेची संधी उपलब्ध करून दिली होती. त्यापैकी बेस्ट फोरमधून विद्यार्थ्यांची निवड केली गेली. यावर्षीचा कटऑफ ८७.८९९२२४१ इतका निश्चित झाला आहे. हा कटऑफ गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. ४४ विद्यार्थ्यांमध्ये १८ विद्यार्थ्यांनी चौथ्या परीक्षेत शंभर पर्सेंटाईल प्राप्त केले. त्यामध्ये सौरभचा समावेश आहे. देशभरातील ३३४ शहरांत ९२५ केंद्रांवर ७ लाख ३२ हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २ लाख ५० हजार विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले आहेत. पण १०० पर्सेंटाईल गुण मिळवणाऱ्या राज्यातील ५ विद्यार्थ्यांमध्ये सेलू येथील सौरभने स्थान पटकावल्याने सेलू शहरवासियांमधून सौरभवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मी ध्येयावर ठाम राहिलो आई-वडील दोघेही वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने मी सुद्धा वैद्यकीय क्षेत्र निवडावे, असा दोघांचा आग्रह होता. पण मी इंजिनिअर होण्याच्या ध्येयावर ठाम राहिलो आणि यशस्वी झालो. सर्वात कठीण विषय असलेल्या भौतिकशास्त्रात मला नवीन जिना या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे शंभर गुण मिळवता आले.- सौरभ श्रीनिवास कुलकर्णी, सेलू