उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहन परवाना व अन्य कामांसाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. यामुळे वाहनधारकांना घर बसल्या सर्व सुविधा उपलब्ध होत आहेत. यामध्ये वयाच्या चाळिसीनंतर नवीन शिकाऊ तसेच कायमस्वरूपी वाहन परवाना काढायचा असेल तर कार्यालयात जाऊन ऑफलाईन प्रक्रिया करण्याची गरज उरलेली नाही. ही प्रक्रिया आता ऑनलाइन होणार आहे तसेच यासाठी फिटनेस प्रमाणपत्र एमबीबीएस डॉक्टरांमार्फत घ्यावे लागणार आहे.
लर्निंग लायसन्स ऑनलाइन
सध्या १८ वर्षापुढील कोणत्याही अर्जदाराला लर्निंग लायसन्स काढायचे असल्यास त्याची प्रक्रिया ऑफलाइन ऐवजी ऑनलाइनच करण्यात आली आहे. परिवहन सारथीच्या वेबसाईटवर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर केवळ संगणक परीक्षेसाठी कार्यालयात जावे लागणार आहे. यानंतर लायसन्स दिले जाणार आहे.
किती वयापर्यंत मिळते लायसन्स
कमीत कमी १८ वर्ष पूर्ण झालेल्या उमेदवाराला शिकाऊ व कायमस्वरूपी परवान्यासाठी सुरुवातीला अर्ज करता येतो. शिकाऊ परवाना १ ते ३ महिन्याच्या आत कायमस्वरूपी करण्यासाठी पुन्हा प्रक्रिया करावी लागते. मात्र, यासाठी जास्तीत जास्त वयाची अट घालण्यात आली नाही. केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कोणत्याही वयोगटातील व्यक्तीस दुचाकी तसेच चारचाकी वाहनाच्या परवान्यासाठी अर्ज करता येतो.
वयोवृद्ध असो की ४० वर्ष ओलांडलेल्या कोणत्याही नागरिकास आता ऑनलाइन पध्दतीने वाहन परवाना दिले जाणार आहे. यासाठी एमबीबीएस डॉक्टरांकडून त्यांची शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे तपासणी प्रमाणपत्र एमबीबीएस डॉक्टर ऑनलाइन पद्धतीने या वेबसाईटवर अपलोड करावयाचे आहे. यानंतर परवान्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. - श्रीकृष्ण नकाते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी.
दिवसभरात २०० लायसन्सचा कोटा
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणाऱ्या सर्व वयोगटातील उमेदवारांना दिवसभरात २०० ऑनलाइन लायसन्स देण्याचा कोटा उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या एमबीबीएस डॉक्टर यांनाही ठरावीक प्रमाणपत्र दिवसाला देता येणार आहेत. आतापर्यंत ऑनलाइन पद्धतीने १४ जून ते ३१ जुलै या कालावधीत ८७०३ जणांचे अर्ज प्राप्त झाले.
या तपासणी होणार
लर्निंग तसेच कायमस्वरूपी परवाना काढण्यासाठी ४० वर्ष ओलांडलेल्या नागरिकांनी अर्ज केल्यास त्याच्या डोळ्यांची तसेच हातांची व अन्य अवयवांची शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याची तपासणी एमबीबीएस डॉक्टर करणार आहेत. यानंतरच अर्ज प्रक्रिया राबविली जाणार आहे.