गंगाखेड (परभणी ) : पाण्याच्या शोधात खळी शिवारात आलेल्या हरणांच्या कळपावर खळी तांडा परिसरात कुत्र्यांनी हल्ला चढविला. तेंव्हा हरणांच्या कळपाने तेथुन धुम ठोकली मात्र, या हल्ल्यात हरणाचे एक अडीच महिन्याचे पाडस जखमी झाले. यावेळी शेळ्या घेऊन घराकडे जाणाऱ्या लक्ष्मण जाधव यांनी या पाडसाला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून वनविभागाच्या स्वाधीन केले.
तालुक्यातील खळी शिवारात गुरुवारी सांयकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाण्याच्या शोधात असलेल्या हरणांच्या कळपावर कुत्र्यांनी खळी तांडा शिवारात हल्ला चढविला तेंव्हा चपळ असलेल्या हरणांनी तेथुन धुम ठोकली. मात्र, अडीच महिन्याचे हरणाचे एक पाडस कुत्र्यांच्या तावडीत सापडले. याचवेळी तेथून शेळ्या घेऊन घराकडे जाणाऱ्या लक्ष्मण जाधव यांच्या नजरेस कुत्र्यांचा तावडीत सापडलेले पडस दिसले. त्यांनी तत्काळ त्या कुत्र्यांना हुसकावून लावत जखमी अवस्थेतील पाडसाला सुरक्षित केले.
यानंतर जि.प. सदस्य डॉ. सुभाष कदम, माऊली घुलेश्वर, देविदास जाधव, सचिन जाधव यांच्या मदतीने त्या पाडसाला आज सकाळी गंगाखेड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ श्रीनिवास कारले यांनी जखमी पाडसावर उपचार करुन वनविभागाच्या नियतक्षेत्र वनअधिकारी सिमा राठोड यांच्या स्वाधीन केले.