जिल्ह्यात शासकीय रक्तपेढी बरोबरच दोन खाजगी रक्तपेढ्या कार्यरत आहेत. या रक्तपेढ्यांमधून गरजवंत रुग्णांना रक्तपुरवठा केला जातो. शासकीय रक्तपेढीत जेमतेम शंभर तर खाजगी रक्तपेढीत ६० ते ७० रक्त पिशव्यांचा साठा सध्या उपलब्ध आहे. रक्ताची निर्माण झालेली टंचाई आणि कोरोना काळात रुग्णांना आवश्यक असलेला रक्त साठा लक्षात घेता ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे रक्तदान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे रक्तदान चळवळ मंदावते. जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त झालेले रक्तदान शिबिर वगळता त्यानंतर रक्तदान झाले नाही. त्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे.
दुसऱ्या डोसनंतर २८ दिवसांनी करा रक्तदान
लसीकरणामुळे प्रतिकार क्षमता वाढण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी किमान २८ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे रक्तदान करता येत नाही.
लस दिल्यानंतर प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी विविध घटकांचा वापर केला जातो. त्यामुळे या काळात रक्तदान करू नये, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कोरोना लसीकरणाआधी मी
केले रक्तदान; तुम्हीही करा....!
लसीकरण सुरू असल्याने जिल्हा रुग्णालयात जाऊन रक्तदान करून घेतले आहे. २०१० पासून नियमितपणे किमान १५ वेळा रक्तदान केले. लसीकरणामुळे रक्तदान करता येणार नसल्याने १५ मार्च रोजीच जिल्हा रुग्णालयात रक्तदान केले आहे. आपणही लस घेण्यापूर्वी रक्तदान करून घ्यावे.
-ॲड. अविनाश शिवणकर
जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये १ हजार रक्त पिशव्या साठविण्याची क्षमता आहे. मागच्या महिनाभरापासून रक्तदान शिबिरेच झाली नाहीत. त्यामुळे रक्ताचा साठा कमी झाला आहे. सध्या १०० बॅग रक्त साठा उपलब्ध असल्याने रक्तदान केल्यानंतरच संबंधितांना रक्त दिले जाते.
-उद्धव देशमुख, जिल्हा रक्तपेढी
दोन महिन्यांपासून रक्त पेढीतील साठा मोठ्या प्रमाणात घटला आहे. कोरोनासह इतर आजारांच्या रुग्णांना रक्ताची नितांत आवश्यकता भासते. मात्र रक्तदान शिबिरे होत नसल्याने रक्त साठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा रक्तदानासारख्या राष्ट्रीय चळवळीत सहभागी होऊन लसीकरणापूर्वी रक्तदान करून घ्यावे.
-पंकज खेडकर, लाईफलाईन, रक्तपेढी