मानवत: राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सोमवारी ( दि. 9 सप्टेंबर ) तालुक्यातील रामेटाकळी आणि वझूर बुद्रुक शिवारात जाऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली. यावेळी मंत्री पाटील यांनी चिंता करू नका, पंचनामे पूर्ण होताच मदत वर्ग करू, असे आश्वासन उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने नदीनाल्यांना पूर आले आहे. या पुरामुळे शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मानवत तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. नुकसानीची सर्व माहिती गोळा केल्यानंतर मदत देणे सोपे जाईल असे पाटील यांनी सांगितले. तसेच काळजी करू नका, पंचनामे पूर्ण होताच यादी तयार करून मदत वर्ग करण्याचे आश्वासन यावेळी मंत्री पाटील यांनी दिले.
यावेळी आ. राजेश विटेकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, उपसभापती नारायणराव भिसे, उपविभागीय, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, रवी हरणे, पोलीस निरीक्षक संदीप बोरकर आदी उपस्थित होते.