पूर्णा (परभणी) : येणा-या काळात नांदेड रेल्वे विभागातील विकास कामांना गती येईल. यात मार्गांचे विद्युत व दुहेरीकरण करण्याचा प्रशासनाचा प्राधान्याने प्रयत्न आहे. या सर्व कामाच्या पूर्ततेसाठी आगामी चार वर्षांचा कालावधी लागेल अशी माहिती दक्षिण-मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाप्रबंधक विनोद कुमार सध्या नांदेड विभागाच्या तपासणी दौ-यावर आहेत. या निमित्ताने ते पूर्णा येथे आले असता त्यांनी शहरातील लोकप्रतिनिधी व पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी लोकाप्रतीनिधिनी येथील कर्मचारी व कार्यालयाचे स्थलांतर थांवण्याची मागणी केली असता त्यांनी यास सकारात्मक प्रतिसाद दिला. या सोबतच त्यांनी परभणी- पूर्णा,पूर्णा- नांदेड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पुढील वर्षीच्या बजेट पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
पिट लाईनचे आश्वासन विभागातील मार्गांच्या विद्युतीकरणाची प्राथमिक प्रक्रिया सुरु असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच पूर्णा येथे नव्याने एक वेळी 22 डब्ब्यांची डागडुजी व साफसफाई करण्यासाठी पिट लाईन उभी करण्याचे आश्वासन ही त्यांनी या वेळी दिले. या दरम्यान त्यांनी स्थानकातील सर्व कार्यालयांची पाहणी केली व कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची चाचपणी करीत त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. यावेळी रेल्वेच्या विविध अकरा विभागाचे मुख्य अधिकारी, नांदेड व्यवस्थापक, सुरक्षा कमिशनर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.