पाथरी - कामंच केली नाही म्हणून महाजनादेश यात्रेत पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत आहे. मुख्यमंत्री एमबीए आहेत. त्यांच्या पदवीचा आदर करुन सांगतो आज ती पदवी म्हणजे 'महाबोलबच्चन यात्रा' झाली आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
पाथरीच्या जाहीर सभेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली, अमोल कोल्हे म्हणाले की, १६ हजार भगिनींच्या कपाळावरचे कुंकु पुसले गेले आहे मग मुख्यमंत्री कुणावर ३०२ चा गुन्हा कुणावर दाखल करायचा असा सवाल करत प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने सरकारने पुसलीय अशी टीका त्यांनी केली.
प्रत्येक बाबतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकार करतंय.त्यांना शेतकऱ्यांच्या भावनेचं काहीही देणेघेणे नाही. आज आपण सुपात आहोत उद्या मंदीमुळे जात्यात जाणार आहोत हे लक्षात घ्या असे आवाहनही डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. तसेच सरकारच्या विरोधात कोण बोलायला कोण लागलं की लगेच सीबीआय, ईडीचा घडीबुवा अंगावर सोडला जातोय. सध्या हुकुमशाही सुरु आहे हे लक्षात घ्या असा इशाराही कोल्हेंनी दिला.
पुढेही मीच 'चालू मुख्यमंत्री' राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश आत्ताही मी चालू मुख्यमंत्री आहे आणि पुढेही मीच चालू मुख्यमंत्री राहणार हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा मुख्यमंत्री काढत आहेत अशी जोरदार टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याच सभेत केली. सत्तेत आल्यावर लगेच कर्जमाफी करतो असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले होते परंतु ही फसवी योजना निघाली आहे. शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. फसवी कर्जमाफी जाहीर करणार्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या घरात फूट पाडणारा अनाजी पंत होता आणि आताही दोन छत्रपतींचा घरात फुट कुणी पाडली तर फडणवीस असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.