ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई
परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतामध्ये मुबलक पाणी असतानाही वीजपुरवठा खंडित असल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. महावितरण कंपनीने वसुलीच्या नावाखाली वीजपुरवठा खंडित केला असून, अनेक गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
शेती कामासाठी मिळेनात मजूर
परभणी : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र काढणीच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अधिकचे पैसे देऊनही मजूर मिळत नसल्याने शेतकरी कुटुंबीयच काढणीच्या कामात गुंतल्याचे दिसून येत आहे. मजुरांअभावी शेती कामे विस्कळीत होत आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर लघुविक्रेत्यांचे अतिक्रमण
परभणी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जिंतूररोड भागात लघु विक्रेत्यांनी अतिक्रमणे केली आहेत. जांब नाका ते जेल कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर लघुविक्रेते रस्त्याकडेला स्टॉल्स टाकून फळांची विक्री करतात. त्यामुळे या मार्गावर नागरिकांची गर्दी होत आहे. भरधाव वेगातील वाहनांमुळे अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे.
रस्ता दुरुस्तीची कामे निधीअभावी ठप्प
परभणी : मागीलवर्षी अतिवृष्टी झाल्याने अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. हे रस्ते वाहतूकयोग्य राहिले नाहीत. ही बाब लक्षात घेता, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली. मात्र अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ठप्प आहेत.