प्रमोद साळवे, गंगाखेड (जि.परभणी) : परभणीहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस क्रं (एमएच २४ एयू ७७२०) मध्ये जागेवर बसण्याच्या वादाचे पडसाद गंगाखेड शहराच्या महाराणा प्रताप चौक येथे शुक्रवारी रात्री पडले. यात एसटी बसच्या काचा फोडून नुकसान केले. यात वाहक-चालकासह दोन प्रवाशांना मारहाण झाली. याप्रकरणी रात्री ९:३० वाजता पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
परभणीहून लातूरकडे निघालेल्या एसटीमध्ये परभणी-गंगाखेड दरम्यान दोन प्रवाशांमध्ये जागेवर बसण्यावरून वाद घडला. त्यातील एका प्रवाशाने गंगाखेडमधील नातेवाईकांना दूरध्वनीद्वारे कळवित मदतीस पाचारण केले. गंगाखेड शहरातील महाराणा प्रताप चौक (परळी नाका) येथे एसटी बसचा अधिकृत थांबा आहे. या ठिकाणी बस थांबताच संबंधित मदत मागणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाईकांनी अचानक एसटीवर हल्ला चढवत चालक-वाहकावर दबावतंत्र वापरत जबरदस्तीने एसटीमध्ये घुसून वाद झालेल्या प्रवाशाला मारहाण केली. यामुळे बसमधील अन्य प्रवाशी घाबरून सैरावैरा पळू लागले. शहराच्या मुख्य चौकात घडलेल्या घटनेमुळे गर्दी जमली. घटनेचे वृत्त कळताच पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावास पांगवून बस पोलीस ठाण्यात रवाना केली.
गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री सुरूया घटनेमध्ये बसच्या प्रवेशद्वाराचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण घटनेत दोन प्रवासी जखमी झाले आहेत. रात्री ९:२५ वाजता गंगाखेड ठाण्यात वाहक- चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.