जिंतूर (परभणी ): सावळी येथून लाकडे घेऊन जिंतूरकडे परतणारा टेम्पो झाडावर धडकल्याने चालक जागीच ठार झाला. आज दुपारी (दि. २० ) झालेल्या या अपघातात चार मजूर गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर परभणी येथे उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर येथून तालुक्यातील सावळी येथे एक टेम्पो ( क्रमांक एम एच 04 सी जि 0528 ) आज सकाळी लाकडे आणण्यासाठी गेला होता. दुपारी लाकडे घेऊन परत जिंतुरकडे येत असताना शेवडी शिवारामध्ये चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाला धडकला. यात चालक सय्यद अफरोज सय्यद तय्यब व शेख शोएब शेख उस्मान, मेहताब खा रशीद खान हे दोन मजूर कॅबीनमध्ये अडकले. गॅस कटरच्या मदतीने टेम्पोचा काही भाग कापून बाहेर काढून त्यांना बाहेर काढण्यात यश आले. परंतु चालक सय्यद अफरोज सय्यद तय्यब यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.
यासोबतच टेम्पोच्या जाळीत बसलेले शेख रियाज शेख मुख्तार, शेख सलमान शेख उस्मान हे रस्त्यावर फेकल्या गेल्याने गंभीर झाले आहेत. चारही जखमींवर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी जखमींना परभणी येथे पाठविण्यात आले आहे.
नागरिकांच्या मदतीने वाचले प्राण अपघाताची माहिती मिळताच शेवडी व शहरातील काही नागरिकांनी मदतकार्यासाठी तत्काळ धाव घेतली. प्रसंगावधान राखत नागरिकांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढला व गॅस कटरच्या सहाय्याने काही कॅबिनचा भाग कापून चालक व दोन मजुरांना बाहेर काढले. कॅबिनमधील गंभीर जखमींना वेळीच बाहेर काढल्याने त्यांचे प्राण वाचले आहेत.