देवगाव फाटा : सेलू- देवगाव फाटा या रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक प्रल्हाद शिंदे याला सेलू येथील प्रथम वर्ग न्यायाधीश एस.एन. चव्हाण यांनी अडीच वर्षांचा कारावास व ३ हजार २०० रुपयांचा दंड अशी शिक्षा ४ डिसेंबर रोजी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे- रत्नप्रभा ओमप्रकाश बाहेती यांनी सेलू पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली होती. त्यामध्ये रत्नप्रभा बाहेती यांचे पती ओमप्रकाश बाहेती यांच्या सोबत त्या कारने जालना येथे नातेवाईकांकडे जात असताना देवगाव फाटानजीक २१ जून २०१५ रोजी कारचालक प्रल्हाद रंगनाथ शिंदे (रा. सोनपेठ) याने निष्काळजीपणे वाहन चालविले. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लिंबाच्या झाडावर आदळली. या अपघातात ओमप्रकाश बाहेती हे जागीच ठार झाले होते. तर रत्नप्रभा बाहेती या जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक प्रल्हाद शिंदे याच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण सेलू येथील प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्या न्यायालयात चालविले गेले. या प्रकरणात सरकारी वकील ॲड. अनिता धुळे यांनी ८ साक्षीदार तपासले व सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद केला. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायाधीश एस.एन. चव्हाण यांनी दोन्ही बाजू ऐकून ओमप्रकाश बाहेती यांच्या मृत्यूस कारचालक प्रल्हाद शिंदे हे कारणीभूत ठरले. त्यामुळे त्यांना २ वर्षे ६ महिने कारावास व ३ हजार २०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कर्मचारी एन.एल. चव्हाण, दीपक जंबुरे यांनी ॲड. अनिता धुळे यांना सहकार्य केले.