परभणी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या धरणे आंदोलनात रविवारी जिल्ह्यातील ऑटोरिक्षाचालक, शेतकरी, शेतमजूर, कामगार, हमाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाची रविवारी सांगता झाली.
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे, या मागणीसाठी खासदार बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखाली १ सप्टेंबर २०२१ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते. आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, हमाल- मापाडी, ऑटोरिक्षाचालक तसेच इतर वाहनचालकांनी एकजूट दाखवत धरणे आंदोलन केले. परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालेच पाहिजे, वैद्यकीय महाविद्यालय आमच्या हक्काचे, अशा घोषणा देऊन आंदोलनस्थळाचा परिसर दणाणून सोडला.
प्रारंभी अन्नुकुमार व शाहीर प्रकाश कांबळे यांनी ‘तुफानातील दिवे आम्ही’ हे गीत व बतावणी सादर केली. यावेळी मार्गदर्शन करताना खा. बंडू जाधव म्हणाले, परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले जात नाही, हा परभणीकरांवर अन्याय आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हा परभणीकरांची लढाई सुरूच राहणार आहे. खा.बंडू जाधव, आ.डाॅ.राहुल पाटील, रिपब्लिकन सेनेचे विजय वाकोडे, काॅ. राजन क्षीरसागर, काॅ. किर्तीकुमार बुरांडे, अब्दुल भाई, शिवाजी कदम, लक्ष्मणराव बोबडे, गजानन गाडगे, सोमनाथ धोते, सर्जेराव पंडित, मनोहर सावंत, बाबूभाई, गोविंद अग्रवाल यांनी मनोगत मांडले. प्रा.डॉ. पंढरीनाथ धोंडगे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे, संजय सारणीकर, सुधाकर खराटे, मधुकर निरपणे, दशरथ भोसले, संजय गाडगे, सदाशिव देशमुख, माणिकराव आव्हाड, रणजीत गजमल, राम खराबे, प्रभाकर वाघीकर, पंढरीनाथ घुले, अनिल सातपुते, हनुमंतराव पौळ, अर्जुन सामाले, दीपक बाराहाते, रामप्रसाद रनेर, प्रदीप भालेराव, पिराजी आहेरकर, अमोल भिसे, झेलकर बावरी आदींची उपस्थिती होती.