परभणी : येथील एस. टी. महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार आगारांच्या ५७ बसेस रात्री मुक्कामी थांबतात. मात्र, कोणत्याही सुविधा या बसच्या चालक व वाहकांना मिळत नसल्याने दररोज २३२ कर्मचाऱ्यांना संपूर्ण रात्र एस. टी.मध्येच डासांसोबत घालवावी लागत आहे.
जिल्ह्यात पाथरी, गंगाखेड, जिंतूर व परभणी ही चार आगार आहेत. या चार आगारांतून दररोज ४००हून अधिक बसेस धावतात. यातील ५७ बसेस दररोज ग्रामीण व शहरी भागात मुक्कामी असतात. मात्र, या बससोबत असलेल्या २३२ कर्मचाऱ्यांना त्याठिकाणी कोणतीही सुविधा मिळत नसल्याने रात्र डासांसोबतच घालवावी लागत आहे. त्याचबरोबर पाणी व जेवणाची कोणतीही व्यवस्था मुक्कामाच्या ठिकाणी केली जात नाही. उन्हाळ्यात गर्मी, पावसाळ्यात बस गळते तर हिवाळ्यात थंडीत वाहक व चालकांना कुडकुडत बसावे लागते.
शौचाला उघड्यावरच जावे लागते
चार आगारांतून ५७ गावांमध्ये मुक्कामी बस पाठवण्यात येतात. मात्र, या गावांमध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने चालक व वाहकांना सकाळी उठल्यावर शौचासाठी उघड्यावरच जावे लागते. त्यामुळे चालक व वाहकांमध्ये एस. टी. महामंडळाच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मणक्याचे आजार वाढले
एस. टी. महामंडळाकडून ज्या नवीन बस सुरु करण्यात आल्या आहेत, त्या बसमध्ये आसन व्यवस्था आधुनिक असल्याने चालक व वाहकांना रात्री मुक्कामी थांबल्यानंतर एस. टी.मध्ये झोपताना अवघडल्यासारखे होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात चालक - वाहकांमध्ये मणक्याचे आजार वाढले आहेत.
कोरोनामुळे अडचणीत वाढ
ग्रामीण भागात मुक्कामी थांबल्यानंतर बसस्थानक परिसरात असलेल्या हॉटेलमध्ये झोपण्यासाठी जागा मिळायची. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेकवेळा हॉटेल चालक झोपण्यासाठी परवानगी देत नाहीत. कोरोनामुळे चालक व वाहकांच्या पिण्याच्या पाण्यासह झोपण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात कर्मचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार आगारांतील बहुतांश बस या मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ग्रामीण भागात मुक्कामी थांबलेल्या बस गळतात. त्यामुळे वाहक व चालकांसमोर झोपावे कुठे, असा प्रश्न निर्माण होतो.
या संदर्भात मध्यवर्ती कार्यालयाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला आहे. त्याचबरोबर त्रैमासिक सभेत हा प्रश्न उचलून धरत संबंधित सरपंचांनी चालक व वाहकांच्या राहण्याची व जेवणाची सोय करावी, यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात आला.
- गोविंद वैद्य
सचिव, एस. टी. कामगार संघटना