जिंतूर येथील एसटी महामंडळाच्या आगारात उल्हास उंडेगावकर हे चालक म्हणून नोकरीस आहेत. बुधवारी सकाळी ६.१५ वाजता ते आगारात आले. यावेळी त्यांना परभणीसाठी फेरी देण्यात आली; परंतु या मार्गावर जाण्यासाठी वाहन घेण्याच्या कारणावरून वाहनपरीक्षक संजीव भांबळे यांच्यासाेबत त्यांची बाचाबाची झाली. त्यानंतर ड्यूटी टाकण्यासाठी व वाहन देण्यासाठी मला नेहमीच त्रास होत आहे. प्रत्येक वेळी खराब अवस्थेत असलेल्या बसच मला चालवायल्या दिल्या जात आहेत, असा आरोप करून त्यांनी भांबळे यांच्या दालनातच ब्लेडने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना तातडीने परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी जिंतूर पोलिसांत नोंद झाली नव्हती. याबाबत आगारप्रमुख व्ही.आर. चिभडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिंतूर आगारात गाड्या व्यवस्थित नाहीत. यासंदर्भात उंडेगावकर यांनी वाहनपरीक्षक संजीव भांबळे त्यांच्याशी वाद घातला व स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. त्यांना तात्काळ परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सायंकाळी त्यांची छोटीशी शस्त्रक्रिया होणार आहे. संबंधितांची नेमकी तक्रार काय आहे, हे अद्याप समजू शकले नाही.
ड्यूटीसाठी त्रास होत असल्याने चालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:12 AM