- सुभाष सुरवसे, सोनपेठ, जि. परभणी
परतीच्या पावसाने दगा दिला. त्यामुळे जेमतेम तग धरीत उगवलेल्या कपाशीला बाळसेच आले नाही. झाडे जेमतेम वाढली, पण फुले-बोंडे लागली नाही. त्यामुळे कापूस वेचणीचा हंगामच यंदा नशिबी नाही! पहिल्याच वेचणीच्या काळात प-हाट्या उपटण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून प-हाट्याचे जळतन करावे लागत आहे़ सोनपेठ तालुक्यातील बोंदरगाव आणि परिसरात ही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे़
बोंदरगाव परिसरातील शेत शिवारांमध्ये फेरफटका मारताना कापसाची पिके चक्क वाळलेली होती़ बोंडे, पाते गळ सुरू होती़ या भागात पहिली वेचणीही हाती आली नाही़ त्यामुळे पहिल्याच वेचणीत कापसाच्या प-हाट्या झाल्याचे दिसून आले़ दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावशिवात प्रामुख्याने कापूस आणि सोयाबीन ही पिके घेतली जातात़ मात्र पावसाअभावी हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाने हिरावून घेतला आहे़ हंगामाच्या सुरुवातीच्या काळात कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला़ शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फवारणी केली़ फेरोमन ट्रॅप, लाईट ट्रॅप लावून बोंडअळीवर नियंत्रण मिळविले़ पोळ्यापर्यंत ही स्थिती चांगली होती़ परंतु, पावसाने पाठ फिरविल्यामुळे तीन ते चार फुटापर्यंतच कापसाचे पीक मर्यादित राहिले आहे़ बोंडाची संख्या घटली आहे़
सप्टेंबर महिन्यातच आॅक्टोबर हिटचे चटके बसल्याने पात्यांची गळ झाली़ केवळ प-हाट्या शिल्लक राहिल्या आहेत़ ज्या गावातून कापसाची कोट्यवधींची उलाढाल होते तेथे आर्थिक संकट उभे टाकले आहे़ रबी हंगामात तर केवळ पाच टक्के पेरणी झाली आहे़ पुरेशा ओलाव्याअभावी पेरलेले उगवले नाही़ बोंदरगावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने आॅक्टोबर महिन्यातच तळ गाठला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्मण झाला आहे. रबी हंगामात पेरणी नसल्यामुळे चाऱ्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.
सोनपेठ तालुक्यात यावर्षी पावसाने शेतकऱ्यांचा खेळ बिघडवला आहे़ खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या होत्या़ या आशेवरच नगदी पीक म्हणून कापसाची लागवड करण्यात आली होती. मात्र, पाऊस रूसल्याने संपूर्ण तालुक्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोंदरगाव शिवाराला भेट दिली तेव्हा दुष्काळाचे वास्तव अधिक गंभीर असल्याचे दिसून आले़
कापसाचे उत्पादन घटलेकापसाचे बोंडे परिपक्व होण्याच्या काळातच पावसाचा खंड पडला़ त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला़ तालुक्यात कापसाचे उत्पादन घटले आहे़ -गणेश कोरेवाड, तालुका कृषी अधिकारी, सोनपेठ
बळीराजा काय म्हणतो?
स्थलांतर सुरू झालेपावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला आहे़ गावात काम नसल्याने युवक कामाच्या शोधात पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी स्थलांतर करीत आहेत. - मदन सपकाळ
संकटांनी शेतकरी खचलासातत्याने कधी दुष्काळ, कधी लाल्या तर कधी बोंडअळी अशा संकटांनी शेतकरी खचला असून, कोणतेच पीक हाती लागत नसल्याने नैराश्य आले आहे़ - श्यामसुंदर सपकाळ
काय खायचे?अवेळी व कमी पडलेला पाऊस, खरिपाच्या उत्पादनात झालेली मोठी घट आणि पावसाअभावी रबीचे उत्पन्नही मिळणार नसल्याने आता काय करायचे? काय खायचे? असा प्रश्न पडला आहे. - गोकुळदास चतुर
खर्चही निघाला नाहीमला चार एकर शेती असून, चारही एकरात कापूस लावला होता़ पावसाअभावी एकरी दोन ते अडीच क्विंटलचा उतारा आला असून, त्यातून उत्पादन खर्चही निघाला नाही. -रमेश ढमे
काही आकडेवारी : - बोंदरगावचे भौगोलिक क्षेत्र एकूण क्षेत्रफळ : ७२९ हेक्टर- कापूस : ४०० हेक्टरवर- सोयाबीन ३०० हेक्टर- तालुक्याची वार्षिक सरासरी ६९७