परभणी : मानवत तालुक्यातील पेडगाव गावाचा दुष्काळी पाहणी दौरा प्रशासनाने अचानक रद्द केला. यामुळे व्यथित झालेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहणी पथकाचा ताफा ११.३० वाजेच्या दरम्यान मानवत रोडवर अडवला. यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या वेदना समजून घ्या, आम्हाला काही दिल नाही तरी चालेल पण दौरा करा अशी याचना केली.
सेलू तालुक्यातील गणेशपूर परिसरात आज सकाळी दुष्काळी पाहणी पथकाने दौरा केला. यानंतर पथक रूढी या गावाच्या पाहणीसाठी निघाले होते. मानवत रोडवरील रेल्वे फाटक सचखंड एक्सप्रेस आल्याने बंद होते. पेडगावचा दौरा रद्द झाल्याची माहिती सकाळीच प्रशासनाने शेतकऱ्यांना दिली होती. यामुळे येथील शेतकरी मानवत रोडवरील फाटकावर पथकाची वाट पाहत होते. पथक प्रमुख, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींच्या गाड्या येथे येताच शेतकऱ्यांनी गाड्यासमोर आडवे होत पथकाला अडवले.
आमच्या वेदना समजून घ्या रद्द का केला याचा जाब विचारात शेतकऱ्यांनी पेडगावची पाहणी करा, अन्यथा गाड्यासमोर झोपू असा इशारा दिला. आम्हाला माहिती आहे तुम्ही काही देत नाही पण किमान पाहणी तरी करी आमच्या वेदना समजून घ्या अशी याचना शेतकऱ्यांनी केली. यानंतर पथक माघारी फिरत पेडगावच्या दिशेने रवाना झाले.