- मोहन बोराडेसेलू (जि. परभणी)
मूग, सोयाबीन, कापूस करपले धन्याला पीक काढायला परवडना. मजुराला गावात काम मिळेना, पिण्याच्या पाण्यासाठी आताच वनवन करावी लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. दुष्काळाने गाव गाडाच हरवल्याचे चित्र सदर प्रतिनिधीने सेलू तालुक्यातील नांदगावला भेट दिल्यानंंतरच समोर आले.
रबीच्या भरोशावर खरिपाची पेरणी करून जगाच्या पोशिंद्याने स्वप्न बघितली. शेती-भाती आणि घरदाराचे नियोजन केले. प्रचंड पाऊस येणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजावर खरिपाची पेरणी केली. सुरुवातीला पाऊस पडला. मात्र पीक बहरात येताच पाऊस गायब झाला. कापूस, सोयाबीन, मूग, तुरीने माना टाकल्या. पीक सुकू लागले. पाहता पाहता खरिपातील पीक शेतकऱ्यांच्या हातून गेले. कापूस एका वेचणीत बाद झाला. तर मूग, सोयाबीनने दगा दिला.
सेलू तालुक्यातील नांदगावची लोकसंख्या ६०६ असून येथील ३६५ हेक्टरवर पिकाची लागवड केली जाते. हे गाव सेलू व जिंतूर तालुक्याच्या सिमेवरचं. डोंगरावरच्या शेतीवर नशिब आजमावणारा कष्टाळू गावचा शिवार केवळ ६०० एकरचा आहे. कोणत्याही धरणाचे किंवा कालव्याचे या गावाला पाणी मिळत नाही. म्हणून पावसाच्या पाण्यावरच येथील शेतकरी अवलंबून आहेत. कापूस, ज्वारी, मूग, सोयाबीन व तूर या पारंपरिक पिकावरच गावच्या शेतकऱ्यांचा गावगाडा चालतो; परंतु, पावसाअभावी खरीप हंगाम हातून गेला आहे. परतीचा पाऊस बरसलाच नसल्याने रबीची पेरणी झालीच नाही. म्हणून शेतकरी हादरला आहे.
मोठ्या पेरणीअभावी आजही शेकडो एकर जमीन पडिक दिसत आहे. ज्वारी नसल्याने कडबा नसणार आहे. त्यामुळे जनावरांचा सांभाळ कसा करावा? या विवंचनेत शेतकरी आहे. सोयाबीनच्या भूशावर सध्या जनावरांची गुजरन केली जात आहे. भविष्यात या भागात चारा टंचाई जाणवनार याची चाहूल आत्ताच शेतकऱ्यांना लागू लागली आहे. पाणीपुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्याने खाजगी विहिरीवरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागत आहे. शिवारात एक महिना पुरेल एवढेच पाणी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. म्हणून आगामी काळ भयंकर असणार आहे. असे असले तरी प्रशासनाकडून अद्यापपर्यंतरी कागदावरच नियोजन सुरु आहे. कागदावरचे नियोजन प्रत्यक्ष कृतीत कधी येईल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बळीराजा काय म्हणतो़ ?
- सोयाबीनला वाद्या लागल्या आणि पाऊस कायमचा थांबला. त्यामुळे सोयाबीन जागच्या जागी करपून गेले. दहा पोत्याच्या जागी एक पोत्याचा उतार आला. कसं जगावं? भगवंतालाच काळजी. - ज्ञानोबा थोरात
- सध्या विहिरी आटल्या, पिकाचं सोडा; परंतु, पिण्याच्या पाण्याचं काय करावं! दसऱ्यापासून दोनशे रुपये महिन्याने पाणी विकत घेतोय. कसं साल कडीला जायचं ? -नानासाहेब थोरात
- मी दर साल दिवसाला ५० ते ६० किलो कापूस वेचायचे. या साली दिवसभरात दहा ते बारा किलो कापूस होतोय. किमान तीन वेचण्या होतात;परंतु, यावर्षी एकाच वेचणीत कापसाचा झाडा झाला. पाणी ना शेतात ना गावात. त्यामुळे गावात विकत घेतलेले पाणी दिवसभर पिण्यासाठी शेतात आणाव लागतं. ते औषधासारखं जपून प्यावं लागतं. यावर्षीचा भयान दुष्काळ वाटतो. - शशिकलाबाई विष्णू शिंदे