- मारोती जुंबडे, कुंभारी बाजार, ता. जि. परभणी
खरीप हंगामात २० आॅगस्टपासून परभणी तालुक्यात पावसाने ताण दिल्याने पिके हातची गेली आहेत़ पाऊस झाला असता तर शेतकऱ्यांच्या जलस्त्रोतांची पाणी पातळी वाढली असती; परंतु परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने ऐन पावसाळ्यात कुंभारी बाजार परिसरातील जमिनी भेगाळल्या आहेत. त्यामुळे बळीराजाची तगमग वाढली आहे़.
गतवर्षी खरीप हंगामामध्ये मृग नक्षत्रापासून पावसाला सुरुवात झाली़ शेवटपर्यंत कमी अधिक होत असलेल्या पावसाने पिके चांगलीच बहरली़ परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पासह लघु व मध्यम प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला होता़ त्यातच जायकवाडी प्रकल्पही गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शंभर टक्के भरला होता़ त्यामुळे गतवर्षीचा खरीप व रबी हंगाम शेतकऱ्यांना उभारी देणारा ठरला.
परभणी शहरापासून २५ कि.मी. अंतरावर कुंभारी बाजार हे दुधनाकाठी वसलेले गाव. जवळपास ३ हजार लोकसंख्या असून, मुख्य व्यवसाय शेतीच आहे़ त्यामुळे या गावाचा रहाटगाडा हा शेतीवरच अवलंबून आहे़ जून २०१८ च्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या या हंगामात मोठ्या आशा होत्या़ पीक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवीत शेतकऱ्यांनी कसाबसा पैसा उपलब्ध करून बी-बियाणे व औषधी खरेदी करून पेरणी केली़ मात्र, पावसाळ्याचे दिवस लोटत होते तसे पाऊस कमी होत गेल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले़ ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने शेतशिवारातील पिकांची पाहणी केली असता, भयावह स्थिती समोर आली.
गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला असता या गावामध्ये ५२ दिवसांपासून पावसाचा थेंबही पडला नसल्याचे समजले. त्यामुळे खरीप हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक जागेवरच करपून गेले होते़ ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते, त्यांनी कसेबसे पीक जगवले; परंतु पिकाला पडलेल्या पाण्याच्या ताणामुळे सोयाबीनच्या उताऱ्यामध्ये मोठी घट दिसून आली़ ज्या शेतकऱ्याला गतवर्षी एकरी १० ते १५ क्विंटलचा उतारा आला़ त्याच शेतकऱ्यांना यावर्षी एकरी १ ते २ क्विंटल सोयाबीन झाले़ त्यामुळे खर्चही उत्पादनातून निघाला नाही़
या भागात नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाची परिस्थिती तशीच आहे़ हजारोंचा खर्च करून पोटच्या गोळ्याप्रमाणे लहानाचे मोठे केलेले कापूस पीक पाण्याअभावी सुकले आहे़ गतवर्षीचा बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊनही तीन-चार वेचण्या झाल्या़ मात्र यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव नसतानाही एका वेचणीतच कापसाचा खराटा झाला आहे़ एकंदरीत हजारो रुपयांचा खर्च करून जगविलेले पीक उत्पादन न देताच पाण्याअभावी करपून जात असल्याने शेतकऱ्यांची अवस्था केविलवाणी झाली आहे़ महसूल प्रशासनाने काढलेली नजर आणेवारी ५४ टक्के निघाली असली तरी प्रत्यक्षात वेगळेच सत्य समोर आले आहे़ हे सत्य सरकारी यंत्रणांना कसे समजणार, हा या शेतकऱ्यांचा सवाल.
चाऱ्याचा प्रश्नही भीषणदुधना काठावर वसलेल्या कुंभारी गावातील शेतकऱ्यांना आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाण्याची टंचाई भासली नाही; परंतु भर पावसाळ्यात पाऊस न झाल्याने दुधना नदीपात्र कोरडेठाक पडले आहे़ त्यातच जलस्त्रोतांनीही तळ गाठला आहे़ त्यामुळे भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे़
२ लाख हेक्टर क्षेत्र राहणार पडीककृषी विभागाने २०१८-१९ च्या रबी हंगामाच्या पेरणीसाठी २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे़; परंतु जिल्ह्यात परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने यावर्षी २ लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडीक राहणार आहे़ त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागणार आहे़
बळीराजा काय म्हणतो?
- हजारो रुपयांचा खर्च करून पिके वाढविण्यासाठी धडपड केली; परंतु २० आॅगस्टनंतर या परिसरातच पाऊस झाला नाही़ त्यातच महागडी औषधी वापरून पीक निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु पाण्याअभावी पिके जागेवरच जळून जात आहेत़ त्यामुळे आता काय करावे? असा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे. -भगवान पवार
- खरीप हंगामातील पिकांची परिस्थिती भयावह असताना प्रशासनाने काढलेली नजर आणेवारी ५४ पैशांवर आहे़ त्यामुळे एकीकडून निसर्ग शेतकऱ्यांवर कोपला असताना प्रशासनही शेतकऱ्यांना छळत आहे की काय? असा प्रश्न आमच्या मनात उभा राहत आहे़ त्यामुळे चुकीची आणेवारी रद्द करून सत्य परिस्थिती शासनासमोर मांडावी. -मारोती इक्कर
- परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत ओल राहिली नाही़ भेगाळलेल्या जमिनीत मशागत करताना पशुधन जायबंदी होत आहे़ त्यामुळे रबी हंगामातील पेरणी धोक्यात आली आहे़ या हंगामात पेरणी झाली नाही, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. -आत्तमराव जुंबडे