पूर्णा (परभणी) : तालुक्यातील चुडावा मंडळात शासनाच्या दफ्तरी अतिवृष्टीची नोंद आहे. मात्र, अजूनही या गावातील विहिरी कोरड्या पडलेल्या दिसून येत आहेत.
राज्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती भयावह आहे.मात्र, मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटली तरी तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईचा प्रश्न कायम आहे. यातच चुडावा मंडळात दि. 3 ऑगस्टला बारा तासात 71 मीमी पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे हा भाग अतिवृष्टीमध्ये नोंदवण्यात आला. परंतु, या भागातील स्थिती अतिशय बिकट आहे.
अगोदरच या भागात पाऊस नसल्याने खरीप पेरण्या उशिरा झाल्या. अनेकांच्या पेरण्या ही झाल्या नाही. रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या भरवश्यावर पेरण्या केलेली पिके आज जरी तग धरून दिसत आहेत. पुढील काळात पुरेसा पाऊस न पडल्यास ही पिकेही हातातून जाण्याची शक्यता आहे.शुक्रवारी एकीकडे पूरस्थितीच्या झळकत असताना या परिसरात कोरड्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. येथील शेतकरी कैलास ज्ञानेशवर देसाई,गजानन जळबाजी देसाई,दिनकर बालासाहेब देसाई,रमेश बालासाहेब देसाई यांच्या समाईक विहिरीचे खोदकाम चालू असून राज्यातील विसंगत स्थितीचे विदारक दर्शन घडून येत आहे.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. जल स्त्रोताना अजून पाणी आले नाही. भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासाठी या भागात मोठया पावसाची गरज आहे. - किशोर देसाई, युवा शेतकरी