सेलू- जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न दुधना प्रकल्पात एकाच दिवशी शुक्रवारी सकाळी ६ वाजता तब्बल ८ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.
सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पात २० जुनपासून पाण्याची आवक सुरू झाली आहे. या दिवशी या प्रकल्पात ६ दलघमी पाण्याची आवक झाली होती. त्यानंतर २२ जून रोजी पाणी साठयात पुन्हा वाढ झाली होती. दरम्यान, २४ जूनच्या रात्री जालना जिल्ह्यातील धरण परिक्षेत्रात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ पर्यंत निम्न दुधना प्रकल्पातील जलासाठ्यात १९ दलघमीने एकूण वाढ झाली आहे. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात काही भागात अतिवृष्टी झाली; मात्र निम्न दुधना प्रकल्पात केवळ २० टक्केच पाणी साठा निर्माण झाला होता. दुधना जलाशयातून सेलू शहरासह जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा शहर आणि इतर विविध गावांना पाणी पुरवठा केला जातो.
मृतसाठयात ९४.८६ दलघमी पाणी जून महिन्यातच दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. २० जूनपासुन वेगाने पाण्याची आवक सुरू झाली आहे. परिणामी प्रकल्पाच्या मृतसाठयात ९४.८६ दलघमी पाणी आले आहे. आणखी ७ दलघमी पाणी आल्यानंतर प्रकल्पात जिवंत पाणी साठा निर्माण होणार आहे.