सेलू (जि़परभणी)- बैलाला पाणी पाजण्यासाठी दूधना नदीपात्रात घेवून जात असताना पात्रातील खड्ड्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाली असल्याची घटना काजळी रोहिणा येथे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली़
जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण झाली असून, परभणी व पूर्णा शहराला तसेच नदीकाठावरील गावांना पाणी मिळावे, यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून शनिवारी १५ दलघमी पाणी दुधना नदीपात्रात शनिवारी सोडण्यात आले आहे़ त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून दुधना नदी खळखळून वाहत आहे़ दुधना नदीकाठावरील काजळी रोहिणा येथील श्रीराम महादेव काष्टे (१२) हा मुलगा मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी नदीपात्रात गेला़ नदीपात्रात वाळूमाफियांनी बेसुमार वाळू उपसा केल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत़ नदीपात्रातून जात असताना अचानक खड्डा आल्याने या खड्ड्यात श्रीराम बुडाला़ परिसरातील ग्रामस्थांना ही बाब काही वेळानंतर लक्षात आली़ त्यानंतर त्यांनी श्रीराम काष्टे याला पाण्याबाहेर काढले़ तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आकस्मीक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़